घरांचे कुलूप तोडून रोख रक्कम, दागिने व मौल्यवान वस्तू चोरून नेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले
साईमत /जामनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील सामरोद गावात मध्यरात्री १ ते २ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकाणी धाडसी घरफोडी करत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेत अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत इंद्राबाई चौधरी, गोविंद नारायण चौधरी आणि रमेश झाल्टे यांच्या घरांचे कुलूप तोडून रोख रक्कम, दागिने व मौल्यवान वस्तू चोरून नेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. एका घरात घरमालक झोपेत असतानाच ही घटना घडल्याने चोरट्यांचा धाडसीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
सकाळी घरफोडीचा प्रकार लक्षात येताच संबंधितांनी तात्काळ जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. परिसरात संशयित चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेमुळे सामरोदसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रात्रीची गस्त वाढवावी व चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पोलिस यंत्रणेपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक एम एम कासार यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस करीत आहेत.
