इराण नागरिकेला आश्रय दिल्याप्रकरणी धरणगावात गुन्हा, दोन आरोपींना अटक
साईमत /धरणगाव /प्रतिनिधी :
शहरातील सराय मोहल्ला परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इराण देशातील फरनाज हमीद रेझा मसाई (रा. तेहरान, इराण) आणि तिचा तीन वर्षांचा मुलगा सुफी अली यांना विनापरवानगी व व्हिजाची मुदत संपलेली असतानाही आश्रय दिल्याप्रकरणी धरणगाव पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगावच्या कुरेशी मोहल्ल्यात राहणारे शेख रफीक शेख मुसा आणि शेख अहमद रजा शेख मुसा यांनी फरनाज मसाई आणि तिच्या मुलाला त्यांच्या घरी आश्रय दिला होता. तपासात समोर आले की, महिलेच्या व्हिजाची मुदत २०२२ मध्येच संपलेली होती, तरीही ती गेल्या एक वर्षापासून बेकायदेशीरपणे धरणगावात राहत होती. आरोपींनी स्थानिक पोलीस ठाण्याला कोणतीही माहिती न देता विदेशी नागरिक कायद्याचे उल्लंघन केले.
धरणगाव पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर सराय मोहल्ला परिसरात शोध मोहीम राबवली गेली. चौकशी दरम्यान समोर आले की, ही महिला इराणची नागरिक आहे आणि तिच्या कागदपत्रांची वैधता संपलेली होती. भारतीय विदेशी नागरिक कायदा, २०२५ च्या कलम २४ आणि ८ नुसार, या प्रकारातील माहिती लपवून ठेवणे गुन्हा मानला जातो.
पोलिस कॉन्स्टेबल चंदन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी ८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी तातडीने कारवाई करत शेख रफीक आणि शेख अहमद रजा यांना अटक करण्यात आली.
शहरात या घटनेमुळे चर्चा रंगली असून, महिलेचे भारतात येण्याचे कारण आणि तिला आश्रय देण्यामागचा उद्देश काय होता, याचा तपास पोलीस सध्या करत आहेत.
