जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न
साईमत /जळगाव/प्रतिनिधी :
जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, शांतता आणि सुरक्षिततेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. येत्या १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार असल्याने निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीत निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, संभाव्य अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, मतदान व मतमोजणीच्या दिवशी कडक सुरक्षा व्यवस्था, तसेच पोलीस, महसूल, महानगरपालिका व अन्य यंत्रणांमधील समन्वय व तत्काळ प्रतिसाद यंत्रणा याबाबत सविस्तर चर्चा झाली. संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्याचे, गस्त वाढवण्याचे आणि कोणतीही तक्रार तात्काळ हाताळण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित विभाग प्रमुखांना देण्यात आले.
बैकीठस पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जळगाव शहर महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक यंत्रणेने आपापल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडाव्यात, तसेच निवडणूक प्रक्रियेत कोणतीही ढिलाई होऊ नये, असे निर्देश देण्यात आले.
लोकशाही प्रक्रियेची सुव्यवस्था, विश्वासार्हता आणि पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः कटिबद्ध असल्याचे प्रशासनाकडून ठामपणे नमूद करण्यात आले. नागरिकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. शांततापूर्ण वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि नागरिक यांचा समन्वय महत्त्वाचा असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.
