साईमत अकोला प्रतिनिधी
राज्यात एकीकडे महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची आकोट तालुक्यातील मोहाळा गावात निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण अकोला जिल्ह्यासह महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
कशी घडली थरारक घटना?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हिदायत पटेल हे मोहाळा गावात असताना एका व्यक्तीने अचानक त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. आरोपीने चाकूने पटेल यांच्या पोटात व मानेवर दोन ते तीन गंभीर वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि पटेल जागीच कोसळले. या घटनेचा थरारक व्हिडिओही समोर आला असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हल्ल्यानंतर गंभीर अवस्थेत असलेल्या हिदायत पटेल यांना तातडीने आकोट येथून अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा होताच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली.
हल्ल्याचे कारण अद्याप गूढ
घटनेची माहिती मिळताच आकोट पोलिसांनी तातडीने हालचाली करत हल्लेखोराला अटक केली आहे. मात्र, या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा हल्ला जुन्या वैमनस्यातून झाला की यामागे काही राजकीय षडयंत्र आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने तिचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काँग्रेस पक्षावर शोककळा
हिदायत पटेल यांच्या मृत्यूची बातमी समजताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी अकोला येथील रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली. पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र दुःख व्यक्त करत या हत्येचा निषेध केला. संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त होत असून, काँग्रेस नेतृत्वाकडूनही तीव्र प्रतिक्रिया अपेक्षित आहे.
कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोहाळा गावासह आकोट शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासन सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
राजकारणात हादरा
काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षांच्या हत्येमुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठा हादरा बसला आहे. निवडणूक काळात घडलेल्या या रक्तरंजित घटनेने सुरक्षा, राजकीय वैमनस्य आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
