५ हजारांची मागणी, ४ हजार स्वीकारली – एसीबीने तलाठी पकडला
साईमत /जामनेर/प्रतिनिधी :
जामनेर तालुक्यातील तलाठ्याने फेरफार नोंदीसाठी जमिनीच्या खरेदीदाराकडून ५ हजार रुपयांची लाच मागितली, त्यापैकी ४ हजार रुपये स्वीकारताना जळगाव एसीबीच्या सापळ्यात अडकून रंगेहात पकडला. वसीम राजू तडवी (वय २७) या तलाठ्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार जामनेरचे रहिवासी असून त्यांनी १६ डिसेंबर २०२५ रोजी दोन बिनशेती प्लॉट खरेदी केले होते. खरेदी नोंदवण्यासाठी आणि ७/१२ उताऱ्यावर स्वतःचे व पत्नीचे नाव नोंदवण्यासाठी तलाठी कार्यालयात गेले असता, तलाठी तडवी यांनी लाच मागितली. तक्रारदाराने लाच न देण्याचा निर्णय घेत ७ जानेवारी २०२६ रोजी जळगाव एसीबीला तक्रार नोंदवली.
तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने तत्काळ पडताळणी केली. पंच साक्षीदारांसमोर तलाठीने ५ हजार रुपयांची मागणी करून ४ हजार रुपयांची रक्कम स्वीकारली आणि त्याला रंगेहात अटक करण्यात आली.
ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास व सापळ्याचे आयोजन एसीबी जळगावचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हेमंत नागरे (पोलीस निरीक्षक), बाळू मराठे आणि भूषण पाटील यांनी केले.
