कुसुंबा–धानवडमध्ये दोन कुटुंबांवर आत्महत्येचा आघात
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी :
जळगाव तालुक्यात मंगळवारी (ता. ६) एकामागून एक अशा दोन हृदयद्रावक घटनांनी परिसर सुन्न झाला. कुसुंबा आणि धानवड या गावांत दोन प्रौढांनी घरात एकटे असताना गळफास घेऊन जीवन संपवल्याच्या घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आल्या. या दुर्दैवी प्रकारामुळे दोन्ही गावांत शोककळा पसरली आहे.
कुसुंबा गावातील किराणा व्यावसायिक समाधान भिमराव पाटील (वय ४२) यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. समाधान पाटील यांची पत्नी व मुलगी बाहेरगावी गेली होती, तर मुलगा किराणा दुकानात बसला होता. याच दरम्यान समाधान पाटील यांनी घरात टोकाचे पाऊल उचलले. काही वेळाने मुलगा घरी आला असता, वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्याने किंचाळी मारली. आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि घटनेची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली.
मुलाने ही बाब आईला कळवल्यानंतर नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ समाधान पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, दुसरी घटना तालुक्यातील धानवड गावात घडली. तुकाराम महारू जाधव (वय ३७) यांनीही आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. जाधव कुटुंबातील आई, वडील व मधला भाऊ उसतोडीसाठी पुणे जिल्ह्यात गेले होते, तर सर्वांत लहान भाऊ कामावर गेला असताना घरात तुकाराम जाधव एकटेच होते. याच वेळेत त्यांनी टोकाचा निर्णय घेतला.
लहान भाऊ कामावरून घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. भावाला अशा अवस्थेत पाहून त्याने हंबरडा फोडला. शेजाऱ्यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून तुकाराम जाधव यांनाही मृत घोषित केले. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
एकाच दिवशी तालुक्यात घडलेल्या या दोन आत्महत्यांमुळे सामाजिक आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, कुसुंबा व धानवड गावांत शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.
