जळगावात थरार, आरोपी पाठलाग करून अटकेत
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
न्यायालयाच्या आदेशानुसार पकड वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर एका सराईत तरुणाने चाकू उगारून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना जळगाव शहरात घडली. ही घटना गुजराल पेट्रोल पंपाजवळील हटिल पूजा परिसरात मंगळवारी घडली असून, यावेळी पोलिसांशी जोरदार धक्काबुकीचा प्रकार झाला. आरोपीने पोलिसांच्या तावडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला अटक केली. या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नितेश उर्फ गोल्या मिलिंद जाधव (रा. पिंप्राळा, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध न्यायालयाचे पकड वॉरंट प्रलंबित होते. या वॉरंटच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) कॉन्स्टेबल महेश सोमवंशी आणि उपनिरीक्षक शरद बागल हे कारवाईसाठी गेले होते.
घटनेचा तपशील
एलसीबीचे कॉन्स्टेबल महेश सोमवंशी यांना नितेश जाधव हा गुजराल पेट्रोल पंपाजवळील एका हॉटेलमध्ये असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सोमवंशी व उपनिरीक्षक शरद बागल यांनी संबंधित हॉटेलमध्ये जाऊन आरोपीशी संपर्क साधला. पोलिसांनी त्याला न्यायालयाच्या पकड वॉरंटबाबत माहिती देत अटक होणार असल्याचे सांगितले.
मात्र, आरोपी नितेश जाधव याने पोलिसांसोबत येण्यास स्पष्ट नकार देत अरेरावी सुरू केली. यावेळी त्याने उपनिरीक्षक शरद बागल यांची कॉलर पकडून जोरदार धक्काबुक्की केली. परिस्थिती अधिक चिघळत असताना नितेशने अचानक धारदार चाकू काढून कॉन्स्टेबल महेश सोमवंशी यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत सोमवंशी यांनी हा वार चुकविला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पळ काढण्याचा प्रयत्न; पाठलाग करून अटक
गोंधळाच्या संधीचा फायदा घेत आरोपी नितेश जाधव याने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू केला. काही अंतरावरच पोलिसांनी त्याला पकडण्यात यश मिळविले. त्यानंतर त्याला रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. न्यायालयाचे पकड वॉरंट बजावून त्याला अधिकृतरीत्या अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणे तसेच अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.
शहरात चर्चेला उधाण
दिवसाढवळ्या वर्दळीच्या परिसरात पोलिसांवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांवरच हल्ला होणे ही गंभीर बाब असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. ही घटना गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे द्योतक असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
