शेंगोळा-शहापूर दरम्यानची घटना
साईमत /जामनेर/प्रतिनिधी
भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत चिंचोली पिंपरी येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना जामनेर तालुक्यातील शेंगोळा (यात्रा)-शहापूर दरम्यान असलेल्या धरणाजवळ संध्याकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान घडली. डंपर चालक आपल्या वाहनासह पसार झाल्याचे समजते.
गणेश भरत माळी (वय १८, रा.चिंचोली पिंपरी) असे मयत तरुणाचे नाव आहे.अज्ञात डंपर फत्तेपूर कडून जामनेरकडे येत असताना शेंगोळा यात्रा ते शहापूर दरम्यान असलेल्या धरणाजवळ गणेश माळी हा जामनेरकडून आपल्या गावी मोटार सायकलने जात असताना डंपरने त्याच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात मोटार सायकल चालक गणेश माळी हा तरुण जागीच ठार झाला असून डंपर चालक मात्र घटनास्थळावरून आपल्या वाहनासह पसार झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती जामनेर येथील ना. गिरीश महाजन यांचे कर्तव्यदक्ष आरोग्यदूत जालम सिंग राजपूत यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर अवस्थेत असलेल्या तरुणास जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले असल्याचे समजते.
तरुण वयातच अकाली मृत्यू आल्याने फत्तेपूर चिंचोली, कसबा पिंपरी परिसरात शोककळा पसरली आहे. गणेशच्या पश्चात आई, आजारी वडील,एक विवाहित बहीण असा परिवार असून आई-वडिलांचा आधार मात्र हरपला असल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याच्या भावना जनमानसातून व्यक्त होत आहेत.
जामनेर पोलीस फरार डंपरचा व डंपर चालकाचा शोध घेत असल्याची माहिती मिळत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक एम एम कासार यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस करीत आहेत.
