साईमत जळगाव प्रतिनिधी
पुढील पाच वर्षांत जळगाव शहराचा सर्वांगीण कायापालट करून ते अधिक विकसित, आधुनिक आणि नागरिकाभिमुख शहर म्हणून उभे केले जाईल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जळगाव संदर्भातील विविध राजकीय, सामाजिक व वैचारिक मुद्द्यांवर त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.
वीर सावरकरांविषयी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वीर सावरकरांबाबत आमची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि ठाम आहे. वीर सावरकरांचा कोणताही प्रकारचा विरोध आम्हाला मान्य नाही. त्यांच्या विचारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण नाही. अजित पवार यांनी सावरकर विचारांचा विरोध केल्याचे आपल्याला माहित नाही. त्यांनी तसे केले असेल का, याची खात्री नाही; मात्र भाजपची भूमिका याबाबत ठाम आहे.
जळगाव शहराच्या विकासावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “मी कधीही जळगावला सिंगापूर म्हणत नाही. आपले जळगाव हे आपलेच जळगाव आहे. जे काही विकासाचे काम झाले आहे, ते आमच्याच काळात झाले आहे. आता पुढील टप्प्यात ‘विकसित जळगाव’ हेच आपले ध्येय आहे.” पुढील पाच वर्षांत शहराचा कायापालट करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
बंडखोरी रोखण्याच्या आव्हानावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जनता महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. बंडखोर उमेदवाराला जनता कधीही निवडून देणार नाही. लोकांचा विश्वास महायुतीवर असून, स्थैर्य आणि विकासासाठी तेच पर्याय स्वीकारला जाईल, असा दावा त्यांनी केला.
घराणेशाहीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, राज्यात भाजपने एक ठराविक धोरण आखले आहे. काही ठिकाणी एक-दोन अपवाद झाले असतील, मात्र वेळेवर पर्यायी उमेदवार उपलब्ध न होऊ शकल्याने तसे घडले. दुसरीकडे भाजपने जाणीवपूर्वक घराणेशाहीला प्रोत्साहन दिलेले नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
विलासराव देशमुख यांच्याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, विलासराव देशमुख यांच्याबद्दल पक्षभेद विसरून सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या आठवणी कोणीही पुसू शकत नाही. निवडणुकीच्या काळात सहसा कोणीही दिलगिरी व्यक्त करत नाही; मात्र रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त करून स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे याबाबत कोणीही चुकीचा अर्थ काढू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप प्रवेश घेतलेल्या धुरी यांच्याबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, धुरी हे यापूर्वी दुसऱ्या पक्षात होते आणि त्यांना त्या पक्षातील परिस्थितीची पूर्ण माहिती आहे. काही ना काही नाराजी असल्यामुळेच ते आमच्याकडे आले आहेत. त्यांची भावना ही अनेक कार्यकर्त्यांची भावना असल्याचेही त्यांनी नमूद केले.
युतीच्या राजकारणावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, सध्याच्या युतीत सर्वात जास्त राजकीय नुकसान राज ठाकरे यांचे होत असल्याचे चित्र आहे. एकूणच राज्यातील राजकीय घडामोडी, वैचारिक भूमिका आणि विकासाचा अजेंडा यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या माध्यमातून आपली ठाम आणि स्पष्ट भूमिका मांडली.
