डिप्लोमाच्या एकुलत्या एक विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू
साईमत /पाचोरा – वेरुळी बुद्रुक/प्रतिनिधी
पाचोरा तालुक्यातील वेरुळी बुद्रुक येथे डिप्लोमाचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ५) दुपारी उघडकीस आली. प्रणव संजय महाजन (वय १८, रा. वेरुळी बुद्रुक) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून या घटनेने कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
प्रणव हा जळगाव येथील गोदावरी कॉलेजमध्ये डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. संजय महाजन यांचा तो एकुलता एक मुलगा होता. अभ्यासू, शांत स्वभावाचा आणि सर्वांशी मिळून मिसळून वागणारा विद्यार्थी म्हणून त्याची ओळख होती, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास प्रणव ‘शेतात जाऊन येतो’ असे सांगून घरातून निघाला होता. काही वेळानंतर तो शेतात मृतावस्थेत आढळून आला. ही बाब काका विकास महाजन यांच्या निदर्शनास येताच कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. घटनेचे वृत्त पसरताच नातेवाईक, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
प्रणवने असे टोकाचे पाऊल का उचलले, यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुटुंबीयांनीही कोणतीही पूर्वसूचना किंवा तणावाची चिन्हे जाणवली नसल्याचे सांगितले आहे. घटनेची नोंद करून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. शिक्षणातील ताणतणाव, करिअरविषयीची अनिश्चितता, सामाजिक अपेक्षा यांचा तरुणांच्या मनावर होणारा परिणाम गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कुटुंब, शिक्षक आणि मित्रपरिवार यांनी विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद ठेवणे, त्यांच्या अडचणी ऐकून घेणे महत्त्वाचे असल्याचेही सांगण्यात येत आहे.
या दुर्दैवी घटनेने महाजन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून वेरुळी बुद्रुक गाव शोकमग्न झाले आहे.
