धानोरा विद्यालयात एनसीसी आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान
साईमत /धानोरा, ता.चोपडा /प्रतिनिधी –
शालेय शिक्षणासोबतच खेळ, कला आणि व्यक्तिमत्व विकास यावर भर देणे आवश्यक असून, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांसाठी वाचन करणे खरे आधार कार्ड ठरते, असा संदेश खुशबू महाजन यांनी विद्यार्थ्यांना दिला.धानोरा येथील झिपरु तोताराम महाजन माध्यमिक व नामदेवराव भावसिंग पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये एनसीसी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन यांच्या अध्यक्षतेखाली, प्राचार्य के. एन. जमादार आणि पर्यवेक्षक एल. डी. पाटील यांच्या उपस्थितीत विद्यालयाची माजी विद्यार्थीनी आणि जीसीआय गर्ल्स कॅडेट इन्स्ट्रक्टर कोल्हापूर खुशबू देविदास महाजन यांनी मार्गदर्शन केले.
खुशबू महाजन या विद्यालयाच्या क्रीडाशिक्षक देविदास महाजन यांच्या मुलगी असून, केंद्रशासनाच्या स्टाफ सिलेक्शन बोर्ड परीक्षेत निवड होऊन जीसीआय म्हणून सेवा देत आहेत.
त्यांनी विद्यार्थ्यांना एनसीसी निवड प्रक्रिया, परीक्षा, कॅम्पसाठीची निवड, दिल्ली पासिंग परेड, ग्रेड पद्धत आणि शिस्त याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी खेळाचे जीवनातील महत्त्व, खेळ आणि अभ्यासाचा समन्वय, योग्य तंत्र आणि स्पर्धा परीक्षांसाठी वाचनाचे महत्त्व सांगितले. मोबाईलवर गेम खेळण्यात वेळ घालवण्याऐवजी त्याचा उपयोग अभ्यासासाठी व नवनवीन तंत्र अवगत करण्यासाठी करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच भारतीय संरक्षक खात्याच्या तिन्ही दलांची माहिती देत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्फत अधिकारी बनण्यासाठी प्रेरणा दिली. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून शंका मिटवली आणि पुढील अभ्यासासाठी वाचनाचे संकल्प घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम पाटील यांनी केले तर वक्त्या खुशबू महाजन यांचे कौतुक शालेय समितीचे ज्येष्ठ संचालक बी.एस.महाजन, वामनराव महाजन, योगेश पाटील, सागर चौधरी, व्ही.सी.पाटील आणि अनिल महाजन यांनी केले. विद्यार्थ्यांनी तिच्या शालेय जीवनातील खेळातील कामगिरी बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, कबड्डी, कुस्ती आणि शूटिंग या सर्व प्रकारांमध्ये राष्ट्रीय स्तरावर केलेल्या यशाबाबत ऐकून प्रेरणा घेतली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
