प्रतिभा देशमुख यांची बिनविरोध निवड, महायुतीचे बळ वाढले
साईमत /जळगाव/प्रतिनिधी
जळगाव महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची घोडदौड कायम असून सलग तिसऱ्या उमेदवाराची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. प्रभाग क्रमांक ९ ‘ब’ मधून शिवसेना शिंदे गटाच्या प्रतिभा देशमुख यांची बिनविरोध निवड झाली असून, यामुळे जळगाव महापालिकेत शिंदे गटाने बिनविरोध निवडीची हॅट्रिक साधली आहे. यासोबतच महायुतीच्या एकूण चार उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने राजकीय समीकरणे अधिक मजबूत झाली आहेत.
याआधी प्रभाग क्रमांक १८-अ मधून शिवसेना आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली होती. उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे डॉ. गौरव सोनवणे यांचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर प्रभाग क्रमांक ९ ‘अ’ मधून शिवसेना शिंदे गटाचे मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. त्यांच्या विरोधातील एकमेव अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्याने ही निवड शक्य झाली.
त्यानंतर आता प्रभाग क्रमांक ९ ‘ब’ मध्ये अपक्ष उमेदवार प्रतिभा पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने शिवसेना शिंदे गटाच्या प्रतिभा देशमुख यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. सलग तिसऱ्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाल्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून, जळगाव शहरात पक्षाची ताकद वाढल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, काल भाजपच्या माजी महानगराध्यक्षा उज्ज्वला मोहन बेंडाळे यांची प्रभाग क्रमांक १२ ‘ब’ मधून बिनविरोध निवड झाली होती. आज शिवसेना शिंदे गटाचे तीन उमेदवार बिनविरोध झाल्याने जळगाव महापालिकेत महायुतीच्या एकूण चार उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला मिळालेल्या या यशामुळे विरोधकांवर दबाव वाढला असून, जळगावच्या राजकारणात महायुतीचा वरचष्मा अधिक ठळक होताना दिसत आहे.
