जळगाव महापालिकेतील निवडणुकीत बिनविरोध निवडींची संख्या वाढली
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
जळगाव महानगरपालिकेत महायुतीचा तिसरा, तर शिवसेना शिंदे गटाचा दुसरा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. प्रभाग क्रमांक ९ (ड) मधून शिवसेनेचे उमेदवार मनोज सुरेश चौधरी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यापूर्वी प्रभाग क्रमांक १८ मधून डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली होती. या घडामोडींमुळे महापालिकेतील सत्तासमीकरणात शिवसेना शिंदे गटाने आपली ताकद दाखवून दिली आहे.
जळगाव महापालिकेच्या १९ प्रभागांतील एकूण ७५ जागांसाठी दाखल झालेल्या १,०३८ उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यामध्ये १३५ अर्ज विविध कारणांमुळे बाद ठरले असून ९०३ अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. छाननीदरम्यान तांत्रिक त्रुटी तसेच राजकीय समन्वयाच्या अभावामुळे अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही प्रभागांमध्ये विरोधात एकही उमेदवार नसल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
याआधी भाजपच्या माजी महानगराध्यक्षा उज्ज्वला मोहन बेंडाळे यांची प्रभाग क्रमांक १२ (ब) मधून बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे भाजपने महापालिकेत खाते उघडले होते. त्यानंतर आज शिवसेनेचे डॉ. गौरव सोनवणे यांच्या बिनविरोध निवडीने महायुतीला आणखी बळ मिळाले.
दरम्यान, प्रभाग क्रमांक ९ (ड) मधून माजी नगरसेवक व शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मनोज सुरेश चौधरी यांच्या विरोधातील उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. विशेष म्हणजे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी महायुतीचे चार उमेदवार बिनविरोध निवडून येतील, असे वक्तव्य केल्यानंतर काही मिनिटांतच ही निवड जाहीर झाली. त्यामुळे जळगाव महापालिकेत महायुतीने दमदार पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.
