माजी जिल्हा परिषद सदस्य स्व.निखिल खडसे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना अभिवादन
साईमत/मुक्ताईनगर/ प्रतिनिधी
सहकार आणि समाजकारणाच्या पटलावर आपला वेगळा ठसा उमटवणारे, अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले तसेच ‘आदिशक्ती मुक्ताई’ सूतगिरणीचे माजी अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य स्व.निखिल खडसे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करण्यासाठी चांगदेव येथील मुक्ताई सहकारी सूतगिरणीत ‘अभिवादन सभा’ घेण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांनी स्व.निखिल खडसे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहून केली. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांचे डोळे पाणावले. यावेळी बोलताना माजी सभापती निवृत्ती पाटील यांनी सांगितले, स्व. निखिल खडसे आज आपल्यात नसले, तरी त्यांच्या आठवणी आणि कार्य आपल्यासोबत चिरंतन आहे. परिसरातील युवक आणि महिलांना हक्काचा रोजगार मिळावा, हे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठीच त्यांनी सूतगिरणीच्या रखडलेल्या कामाला गती दिली.
दुर्दैवाने काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले, मात्र रोहिणीताई खडसे यांनी सूतगिरणीचे काम पूर्णत्वास नेऊन निखिल खडसे यांचे स्वप्न पूर्ण केले.ते पुढे म्हणाले, सर्वांत मिसळून राहणारा आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांची जाण असलेला हा नेता आपल्यातून जाणे ही मोठी हानी आहे. मात्र, आज शेकडो युवक आणि महिलांना या सूतगिरणीच्या माध्यमातून मिळालेला रोजगार हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. अभिवादन सभेला समस्त सूतगिरणी कर्मचारी मंडळ, विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व.निखिल खडसे यांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या हितचिंतकांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थितांनी निखिल खडसे यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा आणि त्यांनी दाखवलेल्या समाजकारणाच्या वाटेवर चालण्याचा निर्धार व्यक्त केला.
