नवीन वर्षाची सुरुवात स्वच्छतेने होणार का? प्रश्न उपस्थित
साईमत /यावल /प्रतिनिधी
यावल पोलीस स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ साचलेला केरकचरा आणि तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या ये-जा मार्गावर एका चहावाल्याकडून सर्रासपणे टाकले जाणारे घाण पाणी, यामुळे यावल शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या परिस्थितीत नवीन वर्षाचा शुभारंभ चांगला व स्वच्छ होईल का? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
यावल पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश करताना उजव्या बाजुला मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून, त्याच मार्गावरून तहसीलदार, पोलीस निरीक्षक, शाळकरी विद्यार्थी, ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण, भारतीय स्टेट बँक, सेंट्रल बँक, शनी मंदिर, तहसील कार्यालय तसेच पोलीस स्टेशनमध्ये कामानिमित्त ये-जा करणारे हजारो नागरिक दररोज ये-जा करतात. मात्र, या वर्दळीच्या रस्त्यावर एका चहावाल्याने आपल्या दुकानातील घाण पाणी थेट रस्त्यात टाकण्याचा सपाटा लावल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
यावल-सातोद रस्त्यावर पोलीस स्टेशनसमोर असलेल्या वळणावर सकाळपासून रात्री १०-११ वाजेपर्यंत चहा व्यवसाय सुरू असतो. चहावाल्याकडून प्लास्टिकच्या कॅनमध्ये भरलेले घाण पाणी दिवसातून अनेक वेळा थेट रस्त्यात आणून ओतले जाते. त्यामुळे रस्त्यावर चिखल व दुर्गंधी पसरत असून नागरिकांना घाण पाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे. वाहनांची वर्दळ असल्याने अनेकदा हे घाण पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याच्या घटनाही घडत आहेत.
नागरिकांची गैरसोय आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतानाही संबंधित चहावाल्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत यावल पोलीस स्टेशनमधील जबाबदार कर्मचाऱ्यांना वारंवार माहिती देऊनही कारवाई होत नसल्यामुळे, चहा पाणी मिळत असल्याने दुर्लक्ष तर होत नाही ना? अशी चर्चा शहरात दबक्या आवाजात सुरू आहे.
संपूर्ण प्रकाराकडे नगरपालिका, पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन लक्ष देणार का? घाण पाणी टाकणाऱ्यावर ठोस कारवाई केव्हा होणार? असा प्रश्न यावल शहरातील नागरिक उपस्थित करीत आहेत. स्वच्छता, आरोग्य व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
