संस्कृती महिला मंडळातर्फे महिला बचत गट व गृह उद्योगाला प्रोत्साहन
साईमत /पारोळा/ प्रतिनिधी
लाडशाखीय वाणी समाज मंडळ व संस्कृती महिला मंडळातर्फे महिला बचत गट व गृह उद्योगाला प्रोत्साहन मिळावे यासाठी एक दिवसीय ‘खाना खजाना’ आनंद मेळाव्याचे आयोजन वाणी मंगल कार्यालयात उत्साहात पार पडले.
मेळाव्याचे उद्घाटन वाणी समाज मंडळाचे उपाध्यक्ष हेमकांत मुसळे व सीमा मुसळे यांच्याहस्ते करण्यात आले. मेळाव्यात महिला, युवतींनी उत्स्फुर्त सहभाग घेत विविध खाद्यपदार्थ, कलात्मक हस्तकौशल्याच्या वस्तू, सुती विणकामाच्या वस्तू ,मोत्यांच्या स्वतः तयार केलेल्या वस्तू, पुजेचे साहित्य, संक्रांतीसाठी वाणाच्या वस्तू तसेच गृहोपयोगी घर सजावटीचे साहित्य, असे अनेक प्रकारचे स्टॉल महिलांनी लावले होते. मेळाव्यात आलेल्या बंधु भगिनींनी खरेदीचा व खाण्याचा मनसोक्त आनंद घेतला.
यावेळी यातून व्यवसायाची दिशा मिळाली. घरगुती छोट्या व्यवसायातून आपण आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतो, याची जाणीव झाल्याचे महिलांनी मनोगतात व्यक्त केले.मेळावा आयोजन महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रा.वर्षा प्रकाश पुरकर, रुणल कोतकर, दिपिका शेंडे, वर्षा कोठावदे आदींनी केले. यासाठी वाणी समाज अध्यक्ष विजय नावरकर, उपाध्यक्ष हेमकांत मुसळे, सचिव महेंद्र कोतकर, शरद मेखे, राजेंद्र पाखले, रविंद्र शेंडे व मंडळासह सर्व सभासदांनी सहकार्य केले.
