आंदेकरला न्यायालयाने काही अटी आणि शर्तींसह अर्ज भरण्याची परवानगी
साईमत/पुणे/प्रतिनिधी:
गुन्हेगारी विश्वाशी संबंधित असलेल्या आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्या उमेदवारीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आंदेकर कुटुंबाने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते कोणत्या पक्षाकडून लढणार याबाबात अनेक तर्क- वितर्क लढवले जात होते. अखेर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आंदेकरला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आयुष कोमकर हत्याप्रकरणात तुरुंगात असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक २३ मधून सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. या दोघीही तुरुंगातुन निवडणूक लढवणार आहेत.
बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबातील लक्ष्मी उदयकांत आंदेकर तसेच सोनाली वनराज आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली होती. अजित पवार गटाकडून निवडणूक लढवायची आहे, त्यासाठी अर्ज भरण्याची मुभा मिळावी, अशी मागणी कोर्टाकडे केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. “निवडणूक लढवणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि त्यापासून कोणालाही रोखता येणार नाही,” असे स्पष्ट करत न्यायालयाने आंदेकरला निवडणूक लढण्यास परवानगी दिली होती.
वकिलामार्फत भरला AB फॉर्म
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून बंडू आंदेकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. विशेष म्हणजे, सध्या अटकेत असलेल्या आंदेकरला न्यायालयाने काही अटी आणि शर्तींसह अर्ज भरण्याची परवानगी दिली होती. विशेष न्यायालयाच्या परवानगीनंतर आंदेकर कुटुंबातील तिघे सदस्य भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिले. लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर आणि बंडू आंदेकर यांनी अर्ज दाखल केले होते. अखेर आज शेवटच्या दिवशी आंदेकर यांच्या वकिलांच्या मार्फत AB फॉर्म भरण्यात आले.
