राखी जाधवांची राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाला सोडचिठ्ठी
साईमत/मुंबई/प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीने मुंबईत ठाकरे बंधूच्या युतीशी आघाडी केल्यानंतर जागावाटपात काही वॉर्डावर पाणी सोडावे लागणार असल्यामुळे राखी जाधव नाराज होत्या. ठाकरे बंधू युती आणि काँग्रेस असे दोन पर्याय त्यांच्यासमोर होते. मात्र युतीची बोलणी सुरू असतानाच दुसरीकडे भाजपाने राखी जाधव यांना पक्षात प्रवेश दिल्याने निवडणूक काळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का मानला जात आहे. राखी जाधव यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वीच आपली नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर आता त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही शरद पवारांची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता राखी जाधव यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
आमदार पराग शाह यांच्या उपस्थितीत राखी जाधव यांनी भाजपात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीत २ गट पडल्यानंतरही राखी जाधव यांनी शरद पवारांच्या पक्षात राहणे पसंत केले. मात्र जागावाटपावरून झालेल्या नाराजीनाट्यानंतर राखी जाधव यांनी शरद पवारांची साथ सोडली आहे. राखी जाधव यांनी निवडणुकीत ५२ जागांच्या उमेदवारांची यादी पक्षाकडे दिली होती. युती किंवा आघाडीत पक्षाला किमान ३० जागा मिळणे अपेक्षित होते.
“ठाकरे बंधूंच्या आघाडीत आम्हाला सन्मानजनक वागणूक नक्कीच मिळत आहे. पण सन्मानजनक जागा मिळत नाही आहेत. मुंबईतील २२७ वॉर्डापैकी आम्ही केवळ १५ ते २० जागा मागत आहोत. इतक्या जागा मिळणे अपेक्षित आहेत. यात आमचे विद्यमान नगरसेवक आहेत. काँग्रेसशीही आमची चर्चा सुरू आहे. आम्हाला ज्या जागा हव्या आहेत, त्या मिळाल्या तर आम्ही पुढे जाऊ शकतो. पण शिवसेना किंवा काँग्रेसने त्यावर उत्तर देणे अपेक्षित आहे”, अशी प्रतिक्रिया राखी जाधव यांनी दिली होती.
घाटकोपरमधून राखी जाधवांना भाजपकडून उमेदवारी मिळणार?
घाटकोपरमधून राखी जाधव यांना भाजपाकडून महापालिकेची उमेदवारी मिळणार आहे. जागावाटपात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कमी जागा मिळत असल्याने पक्षात नाराजी वाढली होती. त्याचाच फटका आता पक्षाला बसला. मात्र राखी जाधव यांच्या पक्षप्रवेशामुळे ज्या वार्डातून त्यांना तिकीट मिळणार आहे तिथे भाजपात बंडखोरी होण्याचीही शक्यता आहे.
