बुलढाणा रोडवरील अतिक्रमणधारकांचे लाखोंचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली
साईमत/ मलकापूर/प्रतिनिधी
भरधाव ट्रकवरील चालकाचा ताबा अचानक सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांवर आदळला. ही घटना बुलढाणा रोडवर शनिवार दि.२७ रोजी पहाटे सुमारे २.३० वाजेच्या सुमारस घडली असून अपघातात व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने जीवीतहानी टळली.
ट्रक क्र.(एम.एच.४०-बीसी-५६०८) वरील चालकाचा अचानक ताबा सुटला आणि ट्रक थेट बुलढाणा रोडवरील रस्त्याकडेला असलेल्या दुकानांवर आदळला. या अपघातात अतिक्रमणधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. भीषण अपघातात रस्त्यालगत असलेल्या टपऱ्या, हातगाड्या व त्यातील साहित्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. टपऱ्यांमधील वस्तू रस्त्यावर विखुरल्या गेल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने ही घटना पहाटेच्या वेळी घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र संबंधित व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच मलकापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पंचनामा केला. याप्रकरणी ट्रक चालकाची चौकशी सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
