भाविकांचा जनसागर उसळला, संपूर्ण शिर्डी नगरी ‘साईमय’
साईमत/शिर्डी/प्रतिनिधी :
येत्या नवीन वर्ष २०२६ च्या स्वागतासाठी आणि सरत्या २०२५ वर्षाला निरोप देण्यासाठी शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर पूर्णपणे सज्ज झाले आहे. नाताळच्या सुट्ट्या आणि शनिवार-रविवारचा जोडून आलेला सुट्ट्यांचा काळ यामुळे शिर्डीमध्ये भाविकांचा जनसागर उसळला असून संपूर्ण शिर्डी नगरी ‘साईमय’ झाली आहे. भक्तीच्या या महापुरात भाविकांनी शिर्डीतील रस्ते, चौक आणि गल्लीबोळ गजबजून गेले आहेत.
नाताळच्या सुट्ट्यांच्या निमित्ताने देशभरातून लाखो भाविक शिर्डीत दाखल होत आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार, २५ डिसेंबर रोजी एकाच दिवसात एक लाखांहून अधिक भाविकांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे या गर्दीत आणखीनच भर पडली आहे. गर्दी इतकी प्रचंड आहे की, साईबाबांच्या समाधी दर्शनासाठी भाविकांना तब्बल ६ ते ७ तास प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र, तासनतास रांगेत उभे राहूनही भाविकांच्या उत्साहात कोणतीही घट झालेली दिसत नाही.
वाढती गर्दी लक्षात घेता साईबाबा संस्थान प्रशासनाने चोख नियोजन केले आहे. भाविकांची निवास व्यवस्था, दर्शन व्यवस्था, आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलीस प्रशासन आणि मंदिर प्रशासनाने संयुक्तपणे सुरक्षेचा आराखडा तयार केला असून, पुढील काही दिवस ही गर्दी अशीच कायम राहण्याची शक्यता आहे. आज दिवसभरात सुमारे दीड ते दोन लाख भाविक दर्शनासाठी येतील, असा अंदाज संस्थानने वर्तवला आहे. साईबाबा संस्थानच्या वतीने २५ डिसेंबर २०२५ ते १ जानेवारी २०२६ या दरम्यान आठ दिवसांचा विशेष महोत्सव साजरा केला जात आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ३० डिसेंबर ते १ जानेवारी या तीन दिवसांत पाहायला मिळणार आहे. या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे, ३१ डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दर्शन घेता यावे, यासाठी साईबाबांचे समाधी मंदिर रात्रभर उघडे ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री मंदिराच्या बाहेरील मुख्य स्टेजवर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार असून, भाविकांच्या सुविधेसाठी संस्थानची सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे.
शिर्डी नगरी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आतुर
गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील वाहतूक व्यवस्थेतही काही बदल करण्यात आले असून, भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. भक्ती, श्रद्धा आणि नियोजनाच्या जोरावर शिर्डी नगरी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आतुर झाली आहे.
