साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरातील राजकीय घडामोडींना वेग येत असताना, भारतीय जनता पक्षात सामाजिक क्षेत्रातील सक्रिय व्यक्तिमत्त्वांचा प्रवेश सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर, सामाजिक कार्यकर्ते व सेवानिवृत्त अधिकारी भास्करराव पाटील यांनी बुधवारी (दि. २५ डिसेंबर) भाजपमध्ये जाहीर प्रवेश करून पक्षाला बळकटी दिली आहे.
जी. एम. फाउंडेशन येथे आयोजित स्वागत सोहळ्यात जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश समारंभ पार पडला. आमदार भोळे यांनी नवप्रवेशितांना भाजपचे गमछे देऊन अधिकृत स्वागत केले. या वेळी नवप्रवेशितांनी भाजपच्या विचारधारेशी निष्ठा राखत समाजहितासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
भास्करराव पाटील हे दीर्घकाळ सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असून, विविध उपक्रमांमधून समाजाशी थेट नाळ जपली आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ पक्षसंघटन आणि जनहिताच्या कामांना होईल, अशी उपस्थित मान्यवरांची मते होती.
कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी उदय जी. भालेराव, भगतभाई बालाणी, जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, मुकुंद मेटकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नवप्रवेशितांचे अभिनंदन करून, आगामी काळात संघटनात्मक कामात सक्रिय सहभाग घेण्याची अपेक्षा व्यक्त केली.
या प्रवेशाने जळगावमधील भाजपला सामाजिक क्षेत्रातील अनुभव संपन्न नेतृत्व मिळाले असून, पक्षाच्या राजकीय आणि समाजसंबंधी उपक्रमांना अधिक प्रभावी दिशा मिळेल, असे राजकीय विश्लेषक सांगतात.
