साईमत प्रतिनिधी
नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत असलेल्या रेल्वे प्रवाशांना केंद्र सरकारने दरवाढीचा मोठा धक्का दिला आहे. रेल्वे मंत्रालयाने तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून ही दरवाढ आजपासून (२६ डिसेंबर) लागू झाली आहे. विशेष म्हणजे, ही चालू वर्षातील रेल्वे भाड्यातील दुसरी दरवाढ ठरली आहे.
रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, २१५ किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. सामान्य श्रेणीच्या तिकिटांसाठी प्रति किलोमीटर एक पैसा, तर मेल व एक्सप्रेस गाड्यांमधील नॉन-एसी तसेच एसी वर्गांसाठी प्रति किलोमीटर दोन पैसे वाढ करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्रवाशांना परवडणारे भाडे राखत असतानाच रेल्वेच्या वाढत्या खर्चाचा समतोल राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधीही जुलै महिन्यात रेल्वे भाड्यात वाढ करण्यात आली होती.
दरवाढ कोणाला लागणार नाही?
२१५ किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे दैनंदिन प्रवासी आणि पासधारकांना या दरवाढीचा फटका बसणार नाही, असा दिलासादायक निर्णय रेल्वेने घेतला आहे.
अशी असेल दरवाढ
-
सामान्य नॉन-एसी (२१५ किमी नंतर): प्रति किमी १ पैसा वाढ
-
मेल/एक्सप्रेस (नॉन-एसी): प्रति किमी २ पैसे वाढ
-
सर्व एसी कोचेस: प्रति किमी २ पैसे वाढ
यानुसार,
-
२१६ ते ७५० किमी : ५ रुपये वाढ
-
७५१ ते १२५० किमी : १० रुपये वाढ
-
१२५१ ते १७५० किमी : १५ रुपये वाढ
-
१७५१ ते २२५० किमी : २० रुपये वाढ
या बाबींमध्ये बदल नाही
राजधानी, शताब्दी, दुरंतो, वंदे भारत, तेजस, हमसफर, अमृत भारत, गरीब रथ, जन शताब्दी, अंत्योदय, गतिमान, युवा एक्सप्रेस, नमो भारत रॅपिड रेलसह विशेष गाड्यांमध्येही वर्गनिहाय ही दरवाढ लागू होईल. मात्र, आरक्षण शुल्क, सुपरफास्ट शुल्क यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच जीएसटी पूर्ववत लागू राहणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, हे सुधारित भाडे फक्त आजपासून किंवा आजनंतर बुक केलेल्या तिकिटांसाठीच लागू असेल. याआधी बुक केलेल्या तिकिटांवर, प्रवासाची तारीख पुढील असली तरीही कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नववर्षाच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर या दरवाढीचा नेमका किती परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
