साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी
जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभारी पदावरून निर्माण झालेल्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट आणि परखड भूमिका मांडली आहे. जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी संतोष चौधरी यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, हा निर्णय मला पूर्ण विश्वासात घेऊनच करण्यात आला असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. “मला डावलण्यात आले, असा कुठलाही प्रश्नच उद्भवत नाही,” असे सांगत त्यांनी गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.
खडसे म्हणाले की, आजपर्यंत मी कुठल्याही निवडणुकीत प्रभारी पद स्वीकारलेले नाही. माझ्या प्रकृतीमुळे महापालिका निवडणुकीसाठी आवश्यक असलेली गल्लीबोळांत फिरण्याची जबाबदारी माझ्याकडून पार पाडणे शक्य नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही पक्षाने वेगळे प्रभारी नेमले होते. त्यामुळे प्रभारी पद न स्वीकारणे हा निर्णय पूर्णपणे व्यावहारिक आणि आरोग्याशी संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील पराभवावर बोलताना खडसे यांनी ठाम शब्दांत सांगितले की, “मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) निवडणूक लढवत नव्हता. त्यामुळे त्या पराभवाला माझ्या नावाशी जोडणे चुकीचे आहे.” भाजप नेते गिरीश महाजन यांनी केलेल्या ‘अपशकुनी’ वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना खडसे म्हणाले, “गिरीश महाजन हे सोयीप्रमाणे बोलतात. जर मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव माझ्यामुळे झाला असेल, तर ती माझ्यासाठी आनंदाचीच बाब आहे. कारण मी भाजपचा नाही, तर विरोधक आहे.”
भुसावळ विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या पराभवावरूनही खडसे यांनी थेट सवाल उपस्थित केला. “भुसावळमध्ये जो पराभव झाला, तो गिरीश महाजन यांच्यामुळेच झाला. जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजप पराभूत झाला आहे. मग या सर्व पराभवांची जबाबदारी कोणाची?” असा सवाल उपस्थित करत, “ज्यांनी जबाबदारी घेतली, तेच त्या पराभवाला जबाबदार असतात,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
महापालिका निवडणुकांबाबत बोलताना एकनाथ खडसे यांनी सर्वपक्षीय युतीची भूमिका स्पष्ट केली. “जळगाव महापालिकेत भाजपला टक्कर द्यायची असेल, तर सर्व समविचारी पक्षांनी राष्ट्रवादीसोबत एकत्र येणे गरजेचे आहे. शिवसेना-भाजप एक बाजूला आणि विरोधक विखुरलेले असतील, तर अडचण निर्माण होईल,” असे त्यांनी सांगितले. जागावाटपाबाबतही लवचिक भूमिका घेत, “कोणी दोन पावले पुढे, तर कोणी दोन पावले मागे घेऊन निवडणुका पार पाडाव्या लागतात,” असे मत त्यांनी मांडले.
पिंपरी-चिंचवड, सोलापूरसह काही महापालिकांमध्ये अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र येण्याच्या निर्णयावरही खडसे यांनी समर्थन दर्शवले. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ज्या ठिकाणी जो पक्ष कमजोर असेल, त्याने समविचारी पक्षाची साथ घ्यावी लागते. ज्या महापालिकांमध्ये अजित पवारांचा प्रभाव आहे, तिथे दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणे हा योग्य निर्णय आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
एकूणच, प्रभारी पदावरून गैरसमज, भाजपच्या पराभवांची जबाबदारी आणि आगामी महापालिका निवडणुकांतील युती याबाबत एकनाथ खडसे यांनी स्पष्ट, ठाम आणि आक्रमक भूमिका मांडत राजकीय चर्चांना नवे वळण दिले आहे.
