‘नवरसांची भाव सरिता’ सादरीकरण ; २६० विद्यार्थ्यांचा सहभाग
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात किशोर महोत्सवाअंतर्गत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, शालेय प्रशासन, विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत नुकताच उत्साहात पार पडला. प्रारंभी संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. सुशील अत्रे, सचिव अभिजीत देशपांडे, विश्वस्त प्रेमचंद ओसवाल, मुख्य समन्वयक पद्मजा अत्रे, संचालक प्रा. शरदचंद्र छापेकर, सुरेंद्र लुंकड, पारसमल कांकरिया, सहसचिवा मीरा गाडगीळ, संचालक ॲड. पंकज अत्रे, रजनी पाठक, सचिन दुनाखे, रेवती शेंदुर्णीकर, लता छापेकर, सोनिका मुजुमदार, मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे, पर्यवेक्षिका रमा तारे, संस्थेच्या शाळेतील मुख्याध्यापिका राजश्री कुलकर्णी, सुषमा साळुंखे, सांस्कृतिक समिती प्रमुख सुवर्णा वंजारी, उपप्रमुख स्मिता करे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री गणेश, माता सरस्वती व नटराज पूजन करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतानंतर विद्यार्थ्यांनी गणेशवंदना नृत्य सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर “नवरसांची भाव सरिता” विषयावर आधारित सादरीकरणातून हास्य, श्रृंगार, वीर, करुण, रौद्र, भयानक, बीभत्स, अद्भुत व शांत अशा नवरसांचे प्रभावी दर्शन घडविण्यात आले. ध्वनिमुद्रित संहितेवर आधारित अभिनय व नृत्याच्या माध्यमातून तब्बल २६० विद्यार्थ्यांनी मानवी भावनांचे प्रभावी सादरीकरण केले.
‘मैने पायल है खनकायी’, ‘घर मोरे परदेसीया’, ‘बम बम बोले’, ‘माई तेरी चुनरिया’, ‘लुका छुपी’, ‘काली संहारक मा कालीके’, ‘पावं मे लगाकर वो लाली’, ‘काली मा महाकाली’, ‘रक्तचरित्र’, ‘आवरा भवरे’, ‘पृथ्वी अंबर सात समंदर’, ‘वंदे मातरम्’ आदी गीतांवर सादर केलेल्या मनमोहक समूह नृत्यांनी उपस्थितांची विशेष दाद मिळवली. जीवनातील विविध भावनांचे दर्शन घडवणाऱ्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली.
उपक्रमाची संकल्पना पर्यवेक्षिका रमा तारे तर दिग्दर्शन व मार्गदर्शन मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांनी केले. यासाठी ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे यांनी सहकार्य केले. यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुवर्णा वंजारी तर आभार स्मिता करे यांनी मानले.
