युनिव्हर्सल इंटरनॅशनल स्कूलमध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
साईमत/पारोळा /प्रतिनिधी :
भारताचे माजी पंतप्रधान व शेतकरी नेते चौधरी चरण सिंग यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी २३ डिसेंबर रोजी साजरा होणारा राष्ट्रीय किसान दिवस पारोळा येथील युनिव्हर्सल इंटरनॅशनल स्कूलमध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा सन्मान करण्यासोबतच त्यांच्या समस्या आणि कष्टांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या भूमिकेत सहभागी करून घेत शेती कशा प्रकारे केली जाते, शेतकरी शेतात राहून कशा प्रकारे मेहनत घेतात आणि धान्य उत्पादनासाठी कोणत्या प्रक्रिया करतात, याची सविस्तर माहिती देण्यात आली. शाळेच्या परिसरातच लहान स्वरूपाची शेती तयार करून त्यामध्ये विविध प्रकारच्या पालेभाज्यांची लागवड करण्यात आली. पेरणीपासून ते पीक तयार होईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेतीचे महत्त्व आणि शेतकऱ्यांचे योगदान जवळून समजून घेत किसान दिवस साजरा केला.
या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षक रोहित पाटील, धनंजय पाटील, रोहिणी पाटील, शुभांगी पाटील, कविता पाटील, खुशी दाणेज, मोना खत्री, मोनाली कासार, माधुरी पाठक, वैशाली पाटील आणि कांचन पाटील यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. यावेळी प्री-प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या वेशभूषेत सहभाग घेत कार्यक्रम अधिक आकर्षक केला.
या अभिनव उपक्रमाबद्दल शाळेच्या प्राचार्या गायत्री गुजराती यांनी विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार आणि सामाजिक जाणिवा वाढतात, असे मत व्यक्त केले.
