पशुवैद्यकीय उपचारांमुळे त्या गोवंशाचे प्राण वाचले.
साईमत/पारोळा /प्रतिनिधी :
पारोळा शहरात शौचखड्ड्यात पडलेल्या मोकाट गोवंशाला बजरंग दलाचे कार्यकर्ते व पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ रेस्क्यू करत बाहेर काढले, तर पशुवैद्यकीय उपचारांमुळे त्या गोवंशाचे प्राण वाचले.येथील पोलिस लाईनच्या मागील बाजूस असलेल्या शौचखड्ड्यात मंगळवारी (दि. २३) दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास एक गोवंश जखमी अवस्थेत पडलेला असल्याचे पोलिस कर्मचारी संदीप सातपुते व भुषण पाटील यांच्या निदर्शनास आले.
त्यांनी तात्काळ याबाबत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता बजरंग दलाचे कार्यकर्ते मनोज चौधरी व डॉ. विशाल देवरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस कर्मचारी संदीप सातपुते व भुषण पाटील यांच्या मदतीने शौचखड्ड्यात अडकलेल्या गोवंशाचे सुरक्षितरित्या रेस्क्यू करण्यात आले.
त्यानंतर डॉ. विशाल देवरे यांनी त्या गोवंशावर तातडीने औषधोपचार करून त्याचे प्राण वाचवले. वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.या तत्परतेमुळे व मानवतेच्या भावनेतून केलेल्या कार्याबद्दल पोलिस कर्मचारी, बजरंग दलाचे कार्यकर्ते तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
