जनता कला व वाणिज्य महाविद्यालयात एन.सी.सी. विभागाच्या वतीने घरगुती गॅस अपघात प्रतिबंध व सुरक्षा कार्यशाळा घेण्यात आली.
साईमत/मलकापूर /प्रतिनिधी :
घरगुती गॅसच्या सुरक्षित वापराविषयी जनजागृती निर्माण व्हावी व संभाव्य अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारीची माहिती नागरिकांना मिळावी, या उद्देशाने मंगळवार दि.२३ डिसेंबर रोजी जनता कला व वाणिज्य महाविद्यालयात एन.सी.सी. विभागाच्या वतीने घरगुती गॅस अपघात प्रतिबंध व सुरक्षा कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुधीर चव्हाण होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेफ्टनंट वाय.एस.राजपूत यांनी केले. प्रमुख उपस्थितीत डॉ. एस. एस. शुक्ला होते. कार्यशाळेत रचना गॅस ॲण्ड अप्लायन्सेसचे व्यवस्थापक कुणाल मिलिंद यावतकार यांनी घरगुती एलपीजी सिलिंडर, रेग्युलेटर, पाईप व इतर उपकरणांचा सुरक्षित वापर, गळती ओळखण्याच्या पद्धती तसेच आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच रचना गॅस ॲण्ड अप्लायन्सेसचे मेकॅनिकल तज्ञ सचिन कैलास गायकवाड यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे गॅस उपकरणांची योग्य हाताळणी, गॅस गळतीच्या वेळी करावयाची कृती व प्रतिबंधात्मक उपाय यांची माहिती दिली.
यावेळी डॉ.के.के.पवार, डॉ.टी.पी. मोरे, डॉ.पी.आर. भोगे, डॉ. डी. आर. धुमाळे तसेच डॉ.पुनम बाहेती, अधीक्षक शंकर गवळे, फर्स्ट ऑफिसर संजय कुमरे, सेकंड ऑफिसर पंकज पटेल यांची विशेष उपस्थिती होती.तसेच जनता महाविद्यालय, नूतन विद्यालय, गोविंद विष्णू विद्यालय येथील एन.सी.सी. कॅडेट्स व महाविद्यालयातील इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास १३ महाराष्ट्र बटालियन, खामगाव येथील सुबेदार कमल, बीएचएम सून बाबू, हवलदार नितेश थापा व हवलदार राम टमांगे यांचीही उपस्थिती लाभली.
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. सुधीर चव्हाण यांनी घरगुती गॅसचा वापर दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने त्यासंबंधी सुरक्षिततेची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांसह उपस्थित नागरिकांमध्ये गॅस सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन एन.सी.सी. विभागाच्या वतीने करण्यात आले असून उपस्थितांनी कार्यशाळेचे कौतुक केले.
