कारमध्ये कोंबून चोरट्यांचा थरार, पोलिसात तक्रार दाखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील वर्दळीच्या खोटे नगर परिसरात चोरट्यांनी धाडस दाखवत हॉटेलसमोर बांधलेली गाय थेट कारमध्ये कोंबून पळवून नेल्याची धक्कादायक घटना रविवारी, २१ डिसेंबर रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास घडली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
खोटे नगर भागातील ‘गावकरी हॉटेल’समोर हॉटेल मालकाची गाय नेहमीप्रमाणे बांधलेली होती. मध्यरात्रीच्या सामसुम स्थितीचा फायदा घेत दोन अज्ञात चोरटे पांढऱ्या रंगाच्या ब्रेजा कारमधून घटनास्थळी आले. काही क्षणांतच त्यांनी अत्यंत सराईतपणे गाईला ओढत कारच्या मागील डिक्कीत कोंबले आणि काही सेकंदातच कारसह तेथून पलायन केले. हा संपूर्ण थरारक प्रकार हॉटेल परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे.
घटना निदर्शनास येताच हॉटेल मालकाने तातडीने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही चोरटे तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली कार स्पष्टपणे दिसून येत असतानाही, २४ तास उलटूनही पोलिसांच्या हाती ठोस धागेदोरे लागले नसल्याने नागरिकात नाराजी व्यक्त होत आहे.
शहरात रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी सातत्याने होत असताना, अशा प्रकारच्या धाडसी चोरीच्या घटनांमुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित प्रकरणाचा तातडीने छडा लावून चोरट्यांना अटक करावी. तसेच चोरीस गेलेली गाय लवकरात लवकर परत मिळवून द्यावी, अशी मागणी हॉटेल मालकासह स्थानिक रहिवाशांनी जळगाव तालुका पोलिसांकडे केली आहे.
