मलकापूर नगरपरिषद कारभारावर प्रहारची तक्रार
साईमत/ मलकापूर/प्रतिनिधी :
मलकापूर शहरात सध्या सुरू असलेल्या विविध विकासकामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, ही कामे नगरपरिषदेतील संबंधित अभियंत्यांच्या आशिर्वादानेच सुरू असल्याची जोरदार चर्चा शहरात रंगू लागली आहे. रस्ते, नाले, सौंदर्यीकरण तसेच इतर सार्वजनिक कामांमध्ये निकृष्ट साहित्याचा वापर, नियमांचे सर्रास उल्लंघन आणि अनेक ठिकाणी अपूर्ण व दर्जाहीन कामे सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शहरातील काही भागांत नव्याने झालेल्या रस्त्यांवर काही दिवसांतच भेगा पडल्याचे, नाल्यांची कामे अर्धवट ठेवण्यात आल्याचे तसेच सौंदर्यीकरणाच्या नावाखाली निकृष्ट साहित्य वापरल्याचे प्रकार समोर येत आहेत. या संदर्भात नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या गंभीर प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे. अन्यथा या विषयावर ठोस भूमिका घेत आंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रहारचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष न दिल्यास नगरपरिषदेच्या कारभाराविरोधात जनआक्रोश उभा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
