राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) शिबिराअंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
साईमत/मलकापूर/प्रतिनिधी :
तालुक्यातील पिंप्रीगवळी राष्ट्रीय विद्यालयातर्फे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) शिबिराअंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या पाचव्या दिवशी सावरगाव (ता.मोताळा) येथे कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण पाटील होते.
दुपारच्या सत्रात ‘बौद्धिक संपदा’ या विषयावर धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश जायले यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, कायदा व सुव्यवस्था याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना कायद्याची मूलतत्त्वे समजावून सांगत सामाजिक शिस्त व जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी मलकापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रसिद्ध विधितज्ज्ञ ॲड.जी.डी.पाटील यांनी पॉक्सो (पीओसीएसओ) कायद्याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. तसेच मलकापूर येथील महिला अधिवक्ता ॲड.सुवर्णा चोपडे यांनीही विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमात पत्रकार सुधाकर बोरसे यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक भान व माध्यमांची भूमिका याविषयी यथोचित मार्गदर्शन केले.
शिबिराचे कार्यक्रमाधिकारी पंकज झनके तसेच ॲड.शुभांगी कावस्कर, कोमल गायकवाड, शुभम काटे यांच्यासह राष्ट्रीय विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
