सुरळीत व सुरक्षित वाहतुकीसाठी प्रशासन सज्ज
साईमत/चाळीसगाव/ प्रतिनिधी:
तालुक्यातील औट्रम (कन्नड) घाट मार्गाची जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा घाट मार्ग असल्याने येथे वाहतूक सुरळीत, सुरक्षित आणि अपघातमुक्त राहावी, या दृष्टीने ही पाहणी करण्यात आली.
पाहणीदरम्यान घाटातील रस्त्यांची सद्यस्थिती, वाहतुकीतील अडथळे, संभाव्य अपघातप्रवण ठिकाणे तसेच वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षिततेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सखोल आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना वाहतूक कोंडी होणार नाही याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच घाट मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देशही देण्यात आले.
अपघातप्रवण ठिकाणी सूचना फलक, गतीमर्यादा, वाहतूक नियंत्रण व्यवस्था अधिक प्रभावी करण्यावर भर दिला गेला. वाहतूक पोलीस, नगरपरिषद आणि महसूल प्रशासन यांच्यात योग्य समन्वय राखून कामकाज करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. या पाहणीवेळी चाळीसगाव उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव विभाग, तहसीलदार चाळीसगाव, मुख्याधिकारी नगरपरिषद चाळीसगाव तसेच वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांच्या सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठी जळगाव जिल्हा प्रशासन सदैव कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांची सुरक्षितता, वाहतुकीची सलगता आणि अपघातमुक्त रस्ते व्यवस्था ही जिल्हा प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
