खोटे नगरात बंद घर फोडले ; रोकडसह दागिन्यांवर डल्ला
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील खोटे नगर भागात एका बंद घराला लक्ष्य करून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अशा घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्राप्त माहितीनुसार, खोटे नगर येथील रहिवासी योगेराज पुंडलिक पाटील हे गेल्या १० डिसेंबरपासून आपल्या पत्नीसह नेपाळ येथे देवदर्शनासाठी गेले आहेत. घर बंद असल्याने त्यांचे भाऊ ज्ञानेश्वर पाटील हे घराची देखरेख करत होते. मंगळवारी, १६ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर पाटील घराची पाहणी करण्यासाठी गेल्यावर त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले.
घरात प्रवेश केल्यानंतर संपूर्ण सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश मिळवला आणि घरातील कपाटातून १० हजार रुपयांची रोकड तसेच सोन्याचे दागिने असा २२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चोरीची ही घटना भरदिवसा घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चोरीबाबत ज्ञानेश्वर पाटील यांनी तातडीने जळगाव तालुका पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत बदर करत आहेत.
