सोपान गव्हांडे यांच्या पाठपुराव्याला यश
साईमत/ सोयगाव /प्रतिनिधी :
गेल्या १३ वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले सोयगाव तालुक्यातील घोसला येथील आरोग्य उपकेंद्र अखेर सुरू होण्यास प्रारंभ झाला असून, त्यामुळे घोसला व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे यांचे सातत्यपूर्ण पाठपुरावा, निवेदने आणि प्रशासनाशी केलेल्या संवादामुळे हा मार्ग मोकळा झाला आहे.घोसला येथील आरोग्य उपकेंद्र माजी सरपंच प्रकाश नारायण गव्हांडे तसेच तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य व सध्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख आबासाहेब काळे यांच्या कार्यकाळात मंजूर झाले होते.
त्यावेळी सोयगाव तालुक्यात पाच ते सहा आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी मिळाली होती. मात्र, विविध कारणांमुळे घोसला येथील उपकेंद्र अनेक वर्षे बंदच राहिले. परिणामी, घोसला व आजूबाजूच्या गावांतील नागरिकांना प्राथमिक उपचारांसाठी दूरच्या आरोग्य केंद्रांवर अवलंबून राहावे लागत होते.
अखेर सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, उपकेंद्रात प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या आवश्यक मूलभूत सेवा देण्यात येत असून, येत्या काळात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व औषधसाठा नियमित स्वरूपात उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.आरोग्य उपकेंद्र पुन्हा सुरू होऊ लागल्याने घोसला व परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नागरिकांनी या कामासाठी पुढाकार घेणारे आदरणीय सोपानदादा गव्हांडे यांच्यासह तत्कालीन मंजुरीसाठी प्रयत्न करणारे आबासाहेब काळे व माजी सरपंच प्रकाश गव्हांडे यांचे आभार मानले आहेत.
घोसला येथील आरोग्य उपकेंद्र सुरू होणे ही नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक बाब आहे. माझ्या जिल्हा परिषद सदस्य कार्यकाळात मंजूर केलेल्या या उपकेंद्राचा प्रत्यक्ष लाभ आता जनतेला मिळू लागला आहे, ही समाधानाची गोष्ट आहे. या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे तसेच माजी सरपंच प्रकाश गव्हांडे यांचे अभिनंदन करत पुढील काळात येथे डॉक्टर, कर्मचारी व सर्व आवश्यक सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध राहाव्यात, यासाठीही प्रयत्न केले जातील, शिवसेना जिल्हाप्रमुख आबासाहेब काळे यांनी सांगितले.
