नानासाहेब खोले यांनी मूल्यवर्धन उपक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भात शाळेस भेट दिली.
साईमत/भुसावळ /प्रतिनिधी :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी खुर्द (ता.यावल) येथे मुथा फाऊंडेशनचे मूल्यवर्धन राज्य प्रशिक्षक व समन्वयक नानासाहेब खोले यांनी मूल्यवर्धन उपक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भात शाळेस भेट दिली. त्यांच्या समवेत यावल तालुका मूल्यवर्धन समन्वयक रवींद्र पाटील तसेच रावेर तालुका मूल्यवर्धन समन्वयक श्री.खपली उपस्थित होते.
सकाळी परिपाठापासूनच श्री.खोले शाळेत उपस्थित राहिले. शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना सोनवणे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तर उपशिक्षिका जयश्री काळवीट यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. त्यानंतर राज्यस्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षण (एसआरजी) प्राप्त शिक्षिका जयश्री काळवीट यांनी इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी “माझ्या भावना” हा मूल्यवर्धन उपक्रम राबविला.
या उपक्रमाचे खोले यांनी निरीक्षण केले.
उपक्रमाचे निरीक्षण नोंदविताना श्री.खोले यांनी योग्य प्रस्तावना, अपेक्षित विद्यार्थी प्रतिसाद, गट तयार करण्याची नावीन्यपूर्ण पद्धत, उपक्रमादरम्यान वापरलेले शैक्षणिक साहित्य, विद्यार्थ्यांना लेखी कामासाठी दिलेला पुरेसा वेळ, शांतता संकेतांचा प्रभावी वापर तसेच उपक्रमाचा एकूण सकारात्मक परिणाम याबाबत समाधानकारक मत नोंदवले. उपक्रम अधिक प्रभावी व्हावा यासाठी त्यांनी काही सुधारणा व मार्गदर्शनही केले.
यावेळी इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी श्री.खोले यांना स्वतः तयार केलेली भेटकार्ड सप्रेम भेट दिली. त्याचप्रमाणे श्री.खोले यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी लेखन साहित्य भेट देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. या भेटीमुळे शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये मूल्यवर्धन उपक्रमाबाबत अधिक उत्साह निर्माण झाला असून शाळेचे शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध होण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.
