एजन्सी स्कायलार्क इन्फ्रा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग
साईमत/मलकापूर/प्रतिनिधी :
नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील दसरखेड टोल प्लाझावर वाढत्या धुक्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी विशेष वाहतूक सुरक्षा उपक्रम राबविण्यात आला. टोल प्लाझाची संकलन एजन्सी स्कायलार्क इन्फ्रा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांनुसार आज रविवार, दि. १५ डिसेंबर रोजी वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमात टोल प्लाझावरून जाणाऱ्या वाहनांवर तसेच रस्त्यावरील डिव्हायडरवर रेडियम स्टिकर व आवश्यक सुरक्षा चिन्हे लावण्यात आली. धुक्याच्या परिस्थितीत वाहनांची दृश्यमानता वाढून अपघातांचा धोका कमी व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी स्कायलार्क इन्फ्रा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक भुषण बागुल व मधुकर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. तसेच सतीश यादव, राकेश कोळी यांच्यासह टोल प्लाझाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाहनचालकांनीही या उपक्रमाचे स्वागत करून सुरक्षित वाहतुकीस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
