पवन माळी, रवि झाल्टे, अंबिका डोहाकडे यांना सन्मानपत्र प्रदान
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जळगाव जि.प.च्या दिव्यांग कल्याण विभागातर्फे शासकीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात दिव्यांगांच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात जामनेर येथील विश्वशांती दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पवन माळी यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच नवी दिशा दिव्यांग संस्थेचे रवि झाल्टे, अंबिका डोहाकडे यांनाही सन्मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रोहन घुगे होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पी. एस. म्हस्के, समाज कल्याण विभागाचे गणेशकर यांच्यासह अक्षय महाजन, जितेंद्र पाटील, गणेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच जामनेर शहरातील गणेश साळुंखे, कडुबा सुरवाडे, विश्वनाथ सुरळकर, श्री.मगरे, संदीप चौधरी यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते. कार्यक्रमात दिव्यागांच्या सक्षमीकरणासाठी शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. समाजाने दिव्यागांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.
