अयोध्या नगर रस्त्याचा प्रश्न १० दिवसात सोडवा, अन्यथा रास्ता रोकोचा इशारा
साईमत/जळगाव/जळगाव :
शहरातील अतिव्यस्त आणि महत्त्वाच्या अजिंठा चौफुलीवरून अयोध्या नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या गंभीर समस्येकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे अयोध्या नगर परिसरातील नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अशा प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
जळगाव शहरातील अजिंठा चौफुली हा प्रमुख चौक आहे. येथून सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. याच चौकावरून अयोध्या नगरकडे जाणारा एकमेव मार्ग असल्याने सुमारे ३० ते ४० हजार लोकसंख्येच्या परिसरातील नागरिकांना रॉंग साईडने सिग्नल ओलांडावा लागतो. परिणामी येथे वारंवार लहान-मोठे अपघात होत असून वाहतूक कोंडी ही नित्याची समस्या बनली आहे. या मार्गाने शाळा, महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, नोकरीसाठी जाणारे नागरिक, तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. समोरून येणाऱ्या जड वाहनांमुळे प्रवास अधिकच धोकादायक ठरत असल्याचे मनसेने नमूद केले.
आरोग्यविषयक आपत्कालीन प्रसंग, अंत्यविधीसाठी जाणारी वाहने तसेच दैनंदिन कामांसाठी शहरात जाणे या सर्व बाबी वाहतूक कोंडीमुळे अत्यंत कठीण झाले आहेत. अजिंठा चौफुली ते एमआयडीसीकडे जाण्यासाठी सर्व्हिस रोडची तरतूद असतानाही काही बलाढ्य व धनवान व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे हा रस्ता अद्याप पूर्ण होऊ शकलेला नाही, असा आरोपही करण्यात आला. तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या कच्च्या रस्त्यावरही वाहतुकीचा ताण वाढल्याने गर्दी आणि कोंडी अधिक तीव्र झाली आहे. रॉंग साईडने जाणाऱ्या वाहनांमुळे चौफुलीवर सतत ट्राफिक जाम होत असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
अयोध्या नगरकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा
अजिंठा चौफुलीवर एसटी लक्झरी बस थांबत असल्याने अयोध्या नगरकडे वळणाऱ्या लहान वाहनांना जागा मिळत नाही. त्यामुळे रोजच वाद-विवादाचे प्रसंग उद्भवत असल्याचेही मनसेने स्पष्ट केले. महानगरपालिका आणि एमआयडीसी प्रशासनाने परस्पर समन्वय साधून हा प्रश्न केव्हाच सोडवता आला असता. मात्र, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून अपेक्षित तत्परता दाखवली गेली नसल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन व लोकप्रतिनिधींनी संयुक्तपणे पुढील १० दिवसात ठोस निर्णय घेऊन अयोध्या नगरकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा अयोध्या नगरवासीयांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेतर्फे दिला आहे. हा इशारा मनसेचे जळगाव महानगर उपाध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम तसेच शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिला आहे.
