मनसेने उघड केली प्रशासनाची अनास्था
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून जळगाव महानगरपालिकेच्या नियंत्रणाखाली सुरू केलेले शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र अक्षरशः दुरवस्थेचे चित्र दाखवत आहे. शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सुरू केलेल्या केंद्रात मूलभूत सुविधांचाच अभाव असल्याचे वास्तव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समोर आणले आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रातील स्वच्छतागृहांना दरवाजे नसल्याने रुग्ण, महिला व वृद्ध नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे रुग्णांना बाहेरून पाणी आणावे लागत आहे. आजारपणाच्या अवस्थेतही बाब अधिकच त्रासदायक ठरत आहे. तसेच रुग्णांना बसण्यासाठी आवश्यक असलेली आसन व्यवस्था नसल्याने अनेकांना उभ्यानेच उपचारांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
आरोग्य केंद्राचा संपूर्ण परिसर अस्वच्छ असून कचरा, धूळ व दुर्गंधीमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या ठिकाणी नागरिकांचे आरोग्य सुधारावे, आजारांपासून संरक्षण व्हावे, त्या ठिकाणीच अस्वच्छता आणि दुर्लक्षाचे चित्र दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दुरवस्थेची पाहणी करून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या उदासीनतेवर जोरदार टीका केली. पंधराव्या वित्त आयोगातून आलेला निधी नेमका कुठे खर्च होतो…? नागरिकांच्या आरोग्यासाठी सुरू केलेल्या केंद्रात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणेही प्रशासनाला जमत नसेल, तर अशा योजनांचा उपयोग काय…?, असा प्रश्न मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ आरोग्यवर्धिनी केंद्रातील सर्व त्रुटी दूर कराव्यात, स्वच्छतागृहांना दरवाजे बसवावेत, पिण्याच्या पाण्याची व रुग्णांसाठी आसन व्यवस्थेची सोय करावी. तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित स्वच्छता करावी, अशी ठाम मागणी मनसेकडून केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. दरम्यान, सुप्रीम कॉलनी व परिसरातील नागरिकांनीही प्रशासनाने त्वरित लक्ष घालून आरोग्य केंद्राची अवस्था सुधारावी, जेणेकरून सर्वसामान्य रुग्णांना सन्मानाने व सुरक्षित वातावरणात उपचार मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
अनेक वर्षापासून हॉस्पिटल ‘जैसे थे’
डॉक्टर कर्मचाऱ्यांचा सुलभ शौचालयाची व्यवस्था ही नाही हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून हॉस्पिटल ‘जैसे थे’ आहे, एवढ्या वर्षांमध्ये हे वास्तव कुठल्याही आमदार किंवा नगरसेवकाच्या निदर्शनास आलं नाही हे दुर्दैवच म्हणावं लागेल. तसेच महानगरपालिकेचा आरोग्य विभाग काय करत होता…? हाही प्रश्न अंधारीत आहे. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, उपमहानगराध्यक्ष ललित (उर्फ बंटी) शर्मा, राजेंद्र निकम, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, विभागीय अध्यक्ष उमेश अठरे, हर्षल वाणी यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
