प्रशासनाचे दुर्लक्ष? नागरिकांचा संताप, तात्काळ कारवाईची मागणी
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :
तालुक्यातील खरजई आणि तरवाडे शिवारात मोठ्या प्रमाणात अवैध मुरूम उत्खनन सुरू असून या उत्खननातून मिळणारा मुरूम डंपर आणि इतर भारी वाहनांद्वारे निर्बंधाविना वाहतूक केला जात असल्याची माहिती स्थानिकांतून पुढे आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून उत्खननाचा वेग वाढत असून जेसीबीच्या सहाय्याने दिवसाढवळ्या सुरू असलेले हे काम पर्यावरणासह शेतीसाठी मोठा धोका ठरत आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही परवानगी नसताना होत असलेले हे उत्खनन सरळ बेकायदेशीर असून त्याचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. मुरूमाचा खोलवर झालेला उपसा जमिनीची पातळी खाली बसण्याचा, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा तसेच भूक्षरण होण्याचा धोका निर्माण करत आहे.
या अवैध वाहतुकीमुळे रस्त्यांची परिस्थिती अधिक बिघडत असून, धूळ प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
दरम्यान, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. कोणतीही ठोस कारवाई न होत असल्याने अवैध उत्खनन करणाऱ्यांचे मनोबल वाढले असून उत्खननस्थळी वाहनांची सतत ये-जा सुरू आहे. नागरिकांनी संबंधित विभागावर डोळेझाक करण्याचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अवैध उत्खननामुळे परिसराला वाढलेला धोका लक्षात घेता महसूल विभागाने तातडीने पडताळणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणाला गांभीर्याने हाताळून अवैध उत्खननावर तात्काळ अंकुश लावावा, अशी मागणी चाळीसगाव तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
