नाकाबंदी दरम्यान दोन चोरीची वाहने जप्त
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :
पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा भाग म्हणून चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहर वाहतूक शाखेकडून केलेल्या नाकाबंदीत दोन संशयास्पद मोटारसायकली आढळून आल्या. त्वरित त्या वाहतूक शाखा कार्यालयात जमा केली. आरटीओमार्फत मोटारसायकलींच्या चेसिस आणि इंजिन क्रमांकांची पडताळणी करण्यात आली. तपासात या दोन्ही वाहनांना बनावट नंबर प्लेट लावल्याचे स्पष्ट झाले.
पहिल्या मोटारसायकलवर (एम.एच.१९ एएम १७६४) असा क्रमांक आढळून आला. परंतु तपासणी केल्यानंतर तिचा खरा क्रमांक (एम.एच.२१- बीएल २८३१) असून मालक सतीश दत्तात्रेय भवर (रा. संजय नगर, जुना जालना) असल्याचे निष्पन्न झाले. दुसऱ्या मोटारसायकलीवर (एम.एच.१५-एचझेड ३२५७) असा क्रमांक लावण्यात आला होता. परंतु याचा मूळ क्रमांक (एम.एच.१५ जेआर ११९६) असा असून वाहनमालक अमन किसन लोट (रा.एनएमसी सोसायटी, उपनगर नाशिक) असे समोर आले. दोन्ही वाहनमालकांशी संपर्क साधल्यावर ही वाहने चोरीस गेल्याची खात्री पटली.
संबंधित घटनेबाबत आधीच चोरीच्या तक्रारी स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या होत्या.खास करून (एम.एच.२१- बीएल २८३१) क्रमांकाची मोटारसायकल चंदनझिरा पोलीस ठाणे (जालना) येथे गुन्हा क्रमांक ३१०/२०२१, भादंवि कलम ३७९ अंतर्गत चोरी झाल्याची नोंद असून, तपासानंतर आज ही मोटारसायकल चंदनझिरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना वाहन खरेदी करताना सर्व कागदपत्रांची काळजीपूर्वक पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे. वाहन चालवताना आरसी बुक, इन्शुरन्स, लायसन्स आणि आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगण्याचेही आवर्जून सांगितले आहे. चाळीसगाव शहर वाहतूक शाखेकडून पुढील काळातही अशा विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येतील आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
