जळगावात नाभिक समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
नाभिक समाजातील ९ वर्षाच्या अज्ञान, निरागस बालिकेवर खतनाम, ता. सटाणा, जि. नाशिक येथे एका ७० वर्षीय नराधमाने पाशवी बलात्कार केला आहे. ही घटना संपूर्ण माणुसकीला काळीमा फासणारी तसेच निंदनीय व घृणास्पद आहे. अशाच प्रकारची घटना नुकतीच मालेगाव शहरात घडली आहे. अशा घटनांचा ताबडतोब बंदोबस्त करण्यासाठी संबंधित नराधामास तात्काळ शिक्षा होण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक (जलदगती न्यायालय) न्यायालयात चालविण्यात येऊन खटल्याकामी विशेष सरकारी वकिल म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्त करण्यात यावी. तसेच नराधमास १०० दिवसाचे आत फाशीची शिक्षा देण्यात यावी, शासनाकडून पीडित मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी कुटुंबास मदत मिळावी, अशी मागणीही नाभिक समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. अशा आशयाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी स्वीकारले.
निवेदनावर नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष किशोर वाघ, जगदीश वाघ, भिकन बोरसे, उदय पवार, भैय्या शिवाजी वाघ, महेश साळवी, सागर पवार तसेच महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नाभिक हितवर्धक संघ, नाभिक समाज विकास मंडळ, पिंप्राळा परिसरातील नाभिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
