स्पर्धेत ६५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ लाला नारायण साव स्कूल (शेठ ला. ना. सा. विद्यालय) येथे विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही “किशोर महोत्सव-२०२५” चे आयोजन केले होते. या उपक्रमांतर्गत चित्रकला व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. दोन्ही स्पर्धांमध्ये तब्बल ६५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धा अ, ब आणि क अशा तीन गटात घेण्यात आल्या. चित्रकला स्पर्धेत ‘स्वच्छता अभियान’, ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘भारतातील ए.आय. क्रांती’ विषयांवर ३०० विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या दृष्टीवेधक कल्पनांनी स्पर्धेला एक वेगळेच अविष्कार प्राप्त झाला.सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारावे, विरामचिन्हांचा योग्य वापर, दोन शब्दातील समतोल अंतर, अक्षरांचा आकार व उंची याबाबत योग्य जाण तयार व्हावी, या हेतूने ही स्पर्धा आयोजित केली होती. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील गद्य उतारे उत्कृष्ट पद्धतीने लिहून आपली गुणवत्ता सिद्ध केली.
स्पर्धांना शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे, पर्यवेक्षिका रमा तारे, सांस्कृतिक विभाग प्रमुख सुवर्णा वंजारी, उपप्रमुख स्मिता करे यांनी भेट देऊन विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे मनोबल वाढवले. किशोर महोत्सवातील उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा मिळत आहे. त्यामुळे शाळेत सर्जनशील वातावरण फुलत असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी चित्रकला शिक्षक प्रेमराज सारस्वत, नीलिमा सपकाळे, आनंद पाटील, गौरव देशमुख, जावेद पटेल, हस्ताक्षर समिती प्रमुख नितीन कोष्टी, उपप्रमुख रेखा पाटील, योगेश सोनजे, संगीता कुलकर्णी, वृषाली पाटील, हितेंद्र जोशी, जागृती मोराणकर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
