Ward 18-19 by MNS : प्रभाग १८-१९ मधील नागरी समस्यांचे मनसेकडून पाढा वाचन

0
11

पंधरा वर्षांपासून प्रलंबित विकासाअभावी नागरिक संतप्त

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

शहरातील प्रभाग क्रमांक १८ आणि १९ (माजी १८ नं.) मधील नितीन साहित्य नगर, अमित कॉलनी, कृष्णा नगर, सुप्रीम कॉलनी परिसरातील दीर्घकालीन समस्या, केवळ निवडणुकीपुरती विकासाची चर्चा व पंधरा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांच्या कामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे आणि उपमहानगराध्यक्ष ललित शर्मा यांनी शनिवारी, ६ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मैदानात उतरत प्रभागातील नागरी सुविधांच्या समस्यांचा पाढा वाचत प्रशासनाचे लक्ष वेधले.

प्रभागातील नितीन साहित्य नगर, अमित कॉलनी, कृष्णा नगर, पोलीस कॉलनीचा काही भाग, खूबचंद नगर, सुप्रीम कॉलनी स्टॉप ते सागर अपार्टमेंट या सर्व भागांमध्ये गेल्या १५ वर्षांत रस्ते, सांडपाणी गटार, स्वच्छता, कचरा संकलन अशा कोणत्याही मूलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात झालेल्या नाहीत. विशेष म्हणजे सुप्रीम कॉलनी स्टॉप ते सागर अपार्टमेंट अशा मुख्य रस्त्याचे काम आजतागायत पूर्ण झालेले नाही. काही ठिकाणी २०१७ मध्ये अंथरलेली खडी आजही ‘जैसे थे’ अवस्थेत पडून असल्याचे वास्तव मनसेने समोर आणले.

दरम्यान, मनसेचे उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे यांनी सांगितले की, सुमारे १८ महिन्यांपूर्वी त्यांनी पथदिवे, साफसफाई आणि कचरा संकलनाबाबत महानगरपालिकेकडे अधिकृत मागणी केली होती. त्यानंतर मनसेच्या पाठपुराव्यामुळेच ती कामे सुरू झाली. “शहरात मनसेचा एकही नगरसेवक नसताना केवळ जनहितासाठी आंदोलन, निवेदन आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या जोरावर अनेक प्रश्न मार्गी लावले. मात्र, पंधरा वर्षे सत्ता भोगणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्याची कल्पनाही नव्हती, ही खंतजनक बाब आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रभागातील गटारी आणि सफाई संदर्भातील गंभीर समस्यांबाबत श्रीकृष्ण मेंगडे यांनी आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यावर सोमवारपासून विशेष मोहीम राबवून साफसफाई आणि गटारी स्वच्छ करण्याचे आश्वासन आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले. मात्र, प्रशासनाला त्यानंतर जाग येणार का…?, असा प्रश्नही मनसेकडून उपस्थित केला आहे. मनसेने पुन्हा एकदा प्रभागातील सर्व समस्या दस्तऐवजासह प्रशासनासमोर ठळकपणे मांडल्याने या वेळेस तरी प्रशासनाला जाग येणार का…?, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

यांची होती उपस्थिती

पाढा वाचन कार्यक्रमाला उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, विभाग अध्यक्ष उमेश अठरे, जनहितचे तालुका उपाध्यक्ष विकास पात्रे, निलेश पाटील, साईनाथ भुरीवर, कल्पना कोळी यांच्यासह परिसरातील महिला रहिवासी तसेच मोठ्या संख्येने मनसेचे सैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here