साहित्य क्षेत्रात ‘बहिणाईची लेक’ ओळख असणाऱ्याचा पहिलाच गौरव
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त लेवा गणबोली दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे काव्य संमेलनाचे आयोजन केले होते. महामंडळाने दरवर्षी संमेलन घेतांना साहित्य, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे भरीव योगदान देणाऱ्या एका महिलेला कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्काराने सन्मानित करायचे, असे ठरवले आहे. त्यानुसार यंदाचा प्रथम पुरस्कार खान्देश तसेच महाराष्ट्रात आपल्या साहित्यिक कार्याचा ठसा उमटवणाऱ्या साहित्य क्षेत्रात ‘बहिणाईची लेक’ अशी ओळख असणाऱ्या प्रा.संध्या महाजन यांना देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. माजी महापौर सीमा (राजूमामा) भोळे यांच्या विशेष सौजन्याने काव्यसंमेलनाचे आयोजन केले होते.
परिसरातील उपस्थित सर्व साहित्यिक मंडळींनी प्रा.महाजन यांची निवड योग्यच असून हा त्यांचा कर्तृत्वाचा गौरव आहे, असे सांगितले.
अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्यावतीने आयोजित काव्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रा.किसन वराडे अंबरनाथ होते तर उद्घाटक आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. संमेलनाला महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे (बंडूदादा), प्रथम महापौर आशा कोल्हे, माजी महापौर सीमा भोळे यांच्यासह सर्व पदाधिकारी तसेच अनेक ज्येष्ठ साहित्यिक, कवी यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक ॲड.प्रकाश पाटील यांनी केले.
