
८ लाख रुपयांची रोकड हस्तगत
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत काही दिवसांपूर्वी झालेल्या बॅग लिफ्टिंगच्या गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) यश आले आहे. कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच फिर्यादीकडून हिसकावून नेलेली ८ लाख रुपयांची रोख रक्कम पूर्णपणे हस्तगत केली आहे.
जळगाव शहरातील जुनी जोशी कॉलनी येथील रहिवासी विलास मधुकर जाधव (वय ६७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हा गुन्हा त्वरित उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार केले. गुन्ह्याचा समांतर तपास व तांत्रिक विश्लेषण करत असताना, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दोन आरोपींना ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपींमध्ये विजय शांताराम पाटील (वय ४१, रा. कला वसंत नगर, जळगाव) आणि जितेंद्र छोटुलाल जाधव (वय ४४, रा. ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड, जळगाव) यांचा समावेश आहे. आरोपींनी फिर्यादीकडून हिसकावलेली ८ लाख रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे.
पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि त्यांच्या पथकाने केली.


