Review Of Airport : जिल्हाधिकाऱ्यांकडून विमानतळ विस्तारासाठीचा आढावा

0
3

बैठकीत पायाभूत सुविधांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

जळगाव विमानतळाचा विस्तार करण्यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेला वेग देण्यासाठी कुसुंबा (ता. जळगाव) येथील जमीन संपादनाबाबतची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. विमानतळ विकासाच्या संदर्भातील जमीन मोजणी, मालकी, मूल्यांकन आणि पायाभूत सुविधांच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC), महसूल विभाग, विमानतळ प्राधिकरण तसेच शेतकरी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत जमीन संपादन अहवालांचा तांत्रिक आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला जमीन संपादन प्रक्रियेचा अद्ययावत अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले. जमीन संपादनासंबंधी प्रलंबित मुद्दे, विकासासाठी आवश्यक रनवे विस्तार, सुरक्षा क्षेत्र वाढ, सेवा सुविधा उभारणी यांसंदर्भातील चर्चा बैठकीत करण्यात आली. तसेच हितसंबंधित शेतकरी प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या सूचना व मते जाणून घेण्यात आली. बैठकीस महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मुंबईचे प्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे, भूसंपादन समन्वय अधिकारी, संबंधित विभागीय अधिकारी तसेच शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

जळगाव विमानतळ विस्तार हा जिल्ह्याच्या भविष्यातील औद्योगिक, कृषी, पर्यटन आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. भूसंपादन प्रक्रिया पारदर्शक व गतीमान पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here