महिलांमध्ये उद्योजकतेची नवीन लाट निर्माण होणार
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत कार्यरत केबीसीएनएमयु सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेसतर्फे महिला उद्योजकता दिनाचे औचित्य साधून ‘WE-Women Entrepreneurship’ विशेष उपक्रमाच्या माहितीपत्रकाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. महेश्वरी, भालचंद्र पाटील (मॅनेजिंग डायरेक्टर, वेगा केमिकल्स) यांच्या विशेष उपस्थितीत नुकतेच अनावरण करण्यात आले. हा उपक्रम प्रामुख्याने राज्यातील महिलांना उद्योजकतेकडे प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांना मुख्य प्रवाहातील स्टार्टअप इकोसिस्टमशी जोडण्यासाठी आणि नवोपक्रम क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी राबविण्यात येत आहे. ‘WE’ उपक्रमांतर्गत मिळणाऱ्या संधीमध्ये विशेष उद्योजकीय प्रशिक्षण आणि कार्यशाळा, तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन, नेटवर्किंगच्या संधी आणि उद्योग जगताशी संपर्क, स्टार्टअप सपोर्ट आणि फंडिंगसाठी मार्गदर्शन यांचा समावेश आहे.
याप्रसंगी कुलगुरू प्रा. व्ही. एल. महेश्वरी यांनी महिला सक्षमीकरणावर भर दिला. ते म्हणाले, महिलांनी केवळ पारंपरिक व्यवसायांपुरते मर्यादित न राहता, ‘WE’ सारख्या उपक्रमांचा लाभ घेऊन नाविन्यपूर्ण उद्योजकतेच्या क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण करावी आणि विकासाची नवीन दिशा ठरवावी, असे सांगितले.
सोहळ्यास केसीआयआयएलचे संचालक मंडळाचे सदस्य डॉ. राजेश जावळेकर, सीए रवींद्र पाटील, प्रा. अरुण इंगळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आणि उपक्रमाची माहिती केसीआयआयएलचे सीईओ डॉ. नवीन खंडारे, पोर्टफोलिओ मॅनेजर योगेश पाटील, प्रोग्राम कोऑर्डिनेटर रोशनी जैन यांनी दिली. या उपक्रमाद्वारे महिलांमध्ये उद्योजकतेची नवीन लाट निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
