जळगाव विद्यापीठासह भारतीय सर्व्हेक्षण विभागात सामंजस्य करार
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि भारतीय सर्व्हेक्षण विभाग, पुणे यांच्यात २१ नोव्हेंबर रोजी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. करारावर भारतीय सर्व्हेक्षण विभाग, महाराष्ट्र व गोवा जी.डी.चे संचालक डॉ. ए. के. सिंग आणि विद्यापीठातर्फे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, पर्यावरण व भूशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. एस. एन. पाटील, प्रा. एस. आर. थोरात, प्रा. व्ही. एम. रोकडे, प्रा. के. पी. दांडगे उपस्थित होते.
सामंजस्य करारामुळे भूस्थानिक माहिती व तंत्रज्ञानाच्या महत्त्वपूर्ण तांत्रिक क्षेत्रात दोन्ही संस्थांमध्ये सहकार्य वाढणार आहे. करारान्वये चर्चासत्रे, कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम आणि इतर संयुक्त उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध होणार असून भूस्थानिक विज्ञानाच्या प्रत्यक्ष उपयोजनातून शैक्षणिक व तांत्रिक अंतर कमी करण्यास मदत होणार आहे.
राष्ट्रीय स्तरावरील मूलभूत डेटा, प्रगत मॅपिंग तंत्र आणि आधुनिक भूस्थानिक साधनांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने त्यांच्या संशोधन क्षमतेत मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. भारत सरकारच्या राष्ट्रीय प्राथमिकतांशी शैक्षणिक संस्था जोडण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
