जळगाव शहर पोलीस स्टेशनला चौघांवर गुन्हा दाखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील एका रिअल इस्टेट व्यावसायिकाला बनावट महिला उभी करून आणि खोटी कागदपत्रे वापरून शेतजमीन विक्रीच्या नावाखाली तब्बल ७ लाख ७४ हजार ७८६ रुपयांची फसवणूक केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी, २१ नोव्हेंबर रोजी जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये चार आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, भगवान काशिनाथ सोनवणे (वय ४२, रा. धनाजी काळे नगर, जळगाव) या रिअल इस्टेट व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, २० जानेवारी २०२५ ते २८ एप्रिल २०२५ दरम्यान ही फसवणूक करण्यात आली. या गुन्ह्यात राजपूत नावाच्या एका महिलेसह, असलमखान अशरफखान (रा. जळगाव), हुसेन मर्चट (रा. नंदुरबार) आणि प्रभाकर सुभाष देशमुख (रा. धुळे) अशा एकूण चार आरोपींचा सहभाग आहे.
आरोपींनी संगनमत करून ‘अनुसया धनलाल शुक्ल’ नावाच्या महिलेच्या मालकीची धरणगाव तालुक्यातील विवरे येथील स.नं. ९३ मधील २ हेक्टर २४ आर शेतजमीन विक्री करायची असल्याचे भासवले. त्यासाठी, त्यांनी अनुसया शुक्ल हिच्या जागी दुसरी एक बनावट महिला फिर्यादींच्या समक्ष उभी केली आणि तीच खरी जमीन मालक असल्याचे दर्शवले.
फिर्यादींनी जमिनीच्या व्यवहारासाठी आरोपींना एकूण ७ लाख ७४ हजार ७८६ रुपये दिले. फसवणूक लक्षात येताच फिर्यादींनी आरोपींना पैसे परत मागितले. आरोपींनी ‘आज देतो, उद्या देतो’ असे बोलून वेळ काढला आणि पैसे परत केले नाहीत. अखेरीस, फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यावर भगवान सोनवणे यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. शुक्रवारी २१ नोव्हेंबर रोजी जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
