61 Gas Cylinders : ६१ गॅस सिलेंडर चोरीचा गुन्हा उघडकीस, ट्रकसह सिलेंडर चोरी करणारा चोरटा गजाआड

0
8

एमआयडीसी पोलिसांचे यश, गुन्हा दाखल 

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

एमआयडीसी परिसरातून ६१ नग गॅस सिलेंडर चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. याप्रकरणात चोरी करणारे दोन आरोपी त्यांच्या गुन्ह्यात वापरलेल्या आयशर वाहनासह गजाआड केले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात १४ नोव्हेंबर रोजी भारत पेट्रोलियम जळगाव येथून रिफिलिंग केलेले ३४२ नग सिलेंडर एका ट्रक वाहनात भरून एमआयडीसी परिसरात पार्किंग केले होते. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी वाहन जागेवर दिसले नाही. रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या वाहनातून ६१ नग सिलेंडरची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास करत असताना, एमआयडीसी पोलिसांनी गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळवत आरोपींची ओळख पटवली. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी पोलिसांनी जळगाव शहरातील एमआयडीसी भागात सापळा रचून शेख फिरोज शेख याकुब (रा. नशिराबाद) या आरोपीस ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन त्याची चौकशी केल्यावर त्याने आपला साथीदार सैय्यद मुश्ताक सैय्यद अशपाक (रा. उस्मानिया पार्क, जळगाव) याच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून चोरी केलेले १ लाख २२ हजार रुपये किमतीचे ६१ नग गॅस सिलेंडर हस्तगत केले. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले सुमारे ५ लाख रुपये किमतीचे आयशर वाहनही जप्त केले आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील यांच्यासह अंमलदारांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here